व्हॉट्सअॅपच्या या नव्या अटी मान्य करा, अन्यथा अकाउंट डिलीट करा !


नवी दिल्ली – सर्वांच्याच गळ्यातील ताईत असलेल्या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना पुढील वर्षापासून आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला कंपनीच्या अटी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी स्वीकारणे अनिवार्य असेल.

अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून या नवीन अटींबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण याबाबतची माहिती व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींचा ( प्रायव्हसी पॉलिसी) एक स्क्रीनशॉट WABetaInfo ने शेअर केला आहे. आमच्या अटी जर स्वीकारायच्या नसतील तर युजर्स आपले व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करु शकतात, असे स्पष्टपणे या स्क्रीनशॉटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 8 फेब्रुवारी 2021 पासून व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार आहे. याशिवाय, 8 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना कंपनीची नवीन पॉलिसी स्वीकारावीच लागेल, अन्यथा त्यांना व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नसल्याचे The Independent ने आपल्या रिपोर्टमध्येही म्हटले आहे.

आपल्या रिपोर्टमध्ये WABetaInfo ने असेही म्हटले आहे की, नववर्षात व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याचीही माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.