केटीएम प्रीमियम सायकल्स भारतात मिळणार

फोटो साभार यु ट्यूब

भारतात आरोग्य जागृती वाढत चालल्याचे दिसून येत आहे आणि करोना काळात लॉकडाऊन काळात यात सर्वाधिक वाढ दिसली आहे. परिणामी भारतात सायकलिंग करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यामुळे सायकलना मागणीही खूप वाढली आहे. भारतात वाढत चाललेला हा ट्रेंड पाहून प्रीमियम सायकल्स साठी प्रसिध्द केटीएम कंपनी भारतीय बाजारात त्यांची उत्पादने घेऊन आली आहे. भारतीय सायकल ब्रांड अल्फावेक्टर बरोबर केटीएमने वितरण करार केला आहे. अल्फावेक्टरचे सहसंस्थापक सचिन चोपडा यांनी गुरुवारी या संदर्भात माहिती दिली.

केटीएमच्या सायकली ३० हजार ते १० लाख रुपये अशा किंमतीत उपलब्ध आहेत. सचिन चोपडा म्हणाले, भारतात सायकल संदर्भात मोठा आणि प्रचंड वेगाने बदल होत आहे. त्यातही प्रीमियम सेगमेंट मध्ये विशेषतः मेट्रो शहरात सायकलिंग हा जीवनशैलीचा भाग बनला आहे.

केटीएम बाईक इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक जोहान्ना उर्कोफ म्हणाले ५६ वर्षांपासून कंपनीने नारंगी रंग उच्च गुणवत्तेचे प्रतिक म्हणून कायम ठेवला असून आजही सातत्याने सायकलबाबत नवीन संशोधन सुरु असते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगलोर, पुणे, हैद्राबाद या शहरातून ७५ टक्के मागणी अपेक्षित असून देशात ३५० शहरात या सायकली उपलब्ध होत आहेत.