हा आहे सेलेब्रिटी बायकर कुत्रा

फोटो साभार हिंदुस्थान टाईम्स

अनेक लोकांना अनेक प्रकारचे छंद असतात. कुणाला खाण्याचा, कुणाला गाण्याचा, कुणाला भटकंतीचा, कुणाला कपड्यांचा, मनोरंजनाचा असे विविध छंद असतात. अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते आणि कुत्रा पाळणारे तर खुपच असतात. असाच एक पाळीव कुत्रा त्याच्या आगळ्या छंदामुळे सोशल मीडियावर खुपच गाजत असून त्याला सेलेब्रिटीचा दर्जा मिळाला आहे. हा डॉगी बायकर डॉगी म्हणून प्रसिध्द आहे. म्हणजे तो खरोखर बाईक चालवितो. इतकेच नव्हे तर मालकाच्या सोबत त्याने बाईक चालवीत अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत.

या कुत्र्याचे नाव बोगी असे असून तो फिलिपाईन्स मधला आहे. ब्लॅक स्पोर्ट्स जॅकेट, डोळ्यावर एवीएटर्स, ऑरेंज हेल्मेट अश्या वेशभूषेत तो थाटात बाईक चालवितो. रॉयटरने या कुत्र्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. बोगी ११ वर्षाचा असून त्याचा मालक गिल्बर्ट देलोर रीयेस याने त्याला तो एक महिन्याचा असताना दोन डॉलर्स मध्ये खरेदी केले होते पण स्वतःचा मुलाप्रमाणे त्याने बोगीचा सांभाळ केला आहे.

रीयेसने बोगी साठी खास हेल्मेट बनवून घेतले आहे. त्यामुळे त्याचे कान हेल्मेट मधून बाहेर राहतात. रीयेस सांगतो, तो सुरवातीपासूनचा बाईक प्रेमी आहे. तो एक महिन्याचा होता तेव्हाच बाईक सुरु केली की तो एकदम उत्साहित व्हायचा, जवळ बसायचा. शेवटी तो चार महिन्याचा झाल्यावर रीयेसने त्याला बाईक चालवायला शिकविले आणि आता तो तरबेज बायकर झाला आहे.