कोविड लस बुकिंग मध्ये भारत १ नंबरवर

फोटो साभार नवभारत

ड्युक विद्यापीठातर्फे कोविड लसीसाठी जगभरातून किती ऑर्डर येत आहेत यावर लक्ष ठेवले असून त्याच्याकडे जमा झालेल्या आकडेवारीवरून भारताने या लसीचे सर्वाधिक डोस बुक केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने तीन कंपन्यांकडून १.६ अब्ज डोस साठी बुकिंग केले आहे. याचा अर्थ ८० कोटी जनतेला या लसीचे डोस देता येणार आहेत. करोनावरील कोविड लस आता दृष्टीक्षेपात येऊ लागली असल्याने या लसीच्या बुकिंग साठी एकच धावपळ सुरु आहे. जगभरातील अनेक देश या लसीचे बुकिंग करत आहेत. आत्तापर्यंत सात कंपन्यांची लस चाचण्यांच्या फेरीत आहे.

भारतापाठोपाठ  युरोपियन युनियनने १.५८ अब्ज डोस साठी बुकिंग केले आहे तर अमेरिकेने १ अब्ज डोस साठी बुकिंग केले आहे. जगभरात विविध कंपन्यांच्या लस चाचण्या सुरु आहेत. त्या पूर्ण होऊन लस वापरास मंजुरी मिळाली की लसीकरण सुरु होणार आहे. भारताने ऑक्सफर्ड लसीच्या ५० कोटी डोस साठी बुकिंग केले असून ही लस भारतात कोविशिल्ड नावाने मिळणार आहे आणि पुण्याच्या सिरम संस्थेत तिचे उत्पादन केले जात आहे. याच बरोबर भारताने नोवाव्हॅक्स लसीचे १ अब्ज डोस बुक केले आहेत आणि गॅमालिया लसीचे १० कोटी डोस बुक केले आहेत. रशियन स्फुटनिक ५ चे १० कोटी डोस बुक केले आहेत.

ऑक्सफर्ड लसीचे अमेरिकेने ५०० दशलक्ष डोस बुक केले आहेत आणि नोवावॅक्सचे १.२ अब्ज डोस बुक केले आहेत कॅनडा, युके ने सात प्रकारच्या लसीचे बुकिंग केले आहे. अमेरिका आणि युरोपिअन युनियनने सहा कंपन्यांच्या लसीचे बुकिंग केले आहे. यात रशिया आणि चीनच्या लसीचा समावेश नाही असे समजते.