‘महाविकास आघाडी’चे उद्याचे भवितव्य भाजपच्या आजच्या विजयामुळे स्पष्ट – प्रविण दरेकर


मुंबई : महाविकास आघाडी धुळे-नंदुरबार पदवीधर मतदार संघात आपली 50 टक्के मतेही राखू शकली नाही. यावरून महाविकास आघाडी सरकारचे उद्याचे भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत असल्याची खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

धुळे नंदुरबारमधील काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अमरीश पटेल यांच्या विजयाने विजयाची श्रृंखला सुरू झाली आहे. भाजप विधानपरिषदेच्या 6 पैकी 6 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यातील जनता तिन्ही पक्षी एकत्र येऊनही भाजपच्या मागेच असल्याचे सिद्ध झाल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

धुळे आणि नंदुरबार पदवीधर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. अमरीश पटेल यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी असून अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. धुळे आणि नंदुरबार पदवीधर निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मते पडली आहे.

437 पैकी 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी 99.31 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. भाजपकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही थेट लढत कोण जिंकणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीत 4 मते बाद करण्यात आली आहे. उरलेल्या 430 मतांची मोजणी पूर्ण झाली असून 216 प्रथम प्राधान्याची मते घेणार उमेदवार जिंकणार असा कल होता.

पण, भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांना मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मतदारांचा कौल मिळाला. तब्बल 332 मिळवून अमरीश पटेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या स्थानिक निवडणुकीला सामोरे जात असून पहिल्याच निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.