इजिप्तमधील या मॉडेलला पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट करणे पडले महागात


इजिप्तमधील पोलिसांनी दोन व्यक्तींना प्राचीन पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट केल्याप्रकरणी अटक केली आहे. ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. सलमा अल्- शिमी या मॉडेलने राजधानी काहिरापासून जवळच असणाऱ्या पिरॅमिडसमोर आपले खास फोटोशूट करुन घेतले होते.

इजिप्तमध्ये प्राचीन काळात ज्या पद्धतीने महिला कपडे परिधान करायचे तसेच कपडे घातून सलमाने फोटोशूट केले होते. पण सलमाला आम्ही ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी फोटोग्राफरलाही सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘डेली मेल’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्राचीन काळातील फेरो राजाच्या राजवटीमध्ये परिधान करण्यात येणारे कपडे घालून मॉडेल सलमाने पिरॅमिडसमोर फोटोशूट केले. पण सलमाने परिधान केलेले कपडे हे अर्धनग्नवस्थेतील होते, असा आक्षेप घेण्यात आला. अशाप्रकारे ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन महत्व असलेल्या ठिकाणी खासगी फोटोशूट केल्याप्रकरणी फोटोग्राफरला अटक करण्यात आली होती. तसेच काही प्रसारमाध्यमांनी सलमालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त दिले होते. इजिप्तमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सलमाने आपल्या इनस्टाग्रामवर अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले. इजिप्तमधील चार हजार ७०० वर्ष जुन्या पिरॅमिड्ससमोर या फोटोंमध्ये सलमा उभी असल्याचे दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या फोटोंच्या माध्यमातून सलमा आणि या फोटोग्राफरने इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीला बदनाम केल्याचा आरोप करण्यात आला. सक्करा हा भाग प्राचीन इजिप्तमधील तीन हजार वर्षांपूर्वीची मोठी दफनभूमी होती. जागतिक वारसा म्हणून या ठिकाणाला दर्जा मिळालेला आहे. हे फोटोशूट याच प्रदेशात करण्यात आले होते.

सध्या इजिप्तमध्ये या फोटोंची खूपच चर्चा होत आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांनाही ताब्यात घेत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने यावेळी दोघांनाही ५०० इजिप्तशीयन पाऊंडचा दंड करुन समज देत सोडून दिले आहे. सलमा आणि फोटोग्राफरला न्यायालयाने दंड आकारुन सोडले असले तरी या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून अनेकांनी सलमावर टीका केली आहे.

सलमा आणि या फोटोग्राफरला हे फोटो काढण्यासाठी कोणी परवानगी दिली त्या सुरक्षा रक्षकांबरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांचा तपास आता पोलीस करत असून सलमा आणि फोटोग्राफरची या प्रकरणात पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

इजिप्तमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सलमाने या फोटोंवरुन वाद निर्माण झाल्यानंतर सोमवारी हे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन डिलीट केले होते. पण तोपर्यंत स्क्रीनशॉर्टच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल झाले होते. मागील काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यावरुन अनेकांना इजिप्तमध्ये तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आल्याची उदाहरणे आहेत.

या फोटोंवरुन सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. सलमाचे एक गट समर्थन करणारा असून दुसरा विरोध करणार आहे. विरोध करणाऱ्यांनी अशाप्रकारे प्राचीन महत्व असणाऱ्या आणि देशाची ओळख असणाऱ्या वास्तूंसमोर फोटो काढू नये असे म्हटले आहे.

सलमाचे समर्थन करणाऱ्यांनी एकीकडे इजिप्तमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पुरुष शर्ट न घालता गाड्यांवर उभे राहून पुरुष शर्ट न घालता गाणी म्हणताना दिसतात, तर दुसरीकडे महिलांना फोटोशूटसाठी अटक केली जाते हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.