न्यायालयाने केंद्र सरकारला दिले सर्व तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचे निर्देश


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला चौकशी करणाऱ्या, तसेच अटकेचे अधिकार असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्यासह सर्व तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डिग उपकरणे बसवण्यात यावे, असे निर्देश दिले.

त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक पोलीस ठाणे, सर्व आगमन व निर्गमन मार्ग, मुख्य द्वार, कोठडय़ा आणि स्वागत कक्षासह सर्वत्र बसवून कुठलाही भाग कक्षेतून सुटणार नाही, हे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी निश्चित करावे, असे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी बसवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिला होता.