शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या: अमरिंदरसिंग


नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये चर्चा होण्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन ते त्वरित संपुष्टात आणावे, अशी विनंती त्यांनी केली. शेतकऱ्यांनीही आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनाचे पंजाबची अर्थव्यवस्था आणि देशाच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठींबा आहे. नवीन कृषिकायदे निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेसशासित पंजाबमध्ये विधेयकही संमत करण्यात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकरी पंजाबमधील आहेत. सर्वांच्या हितासाठी आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच दर्शविली आहे

संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राजधानीतील सर्व रस्ते बंद करून दिल्लीची नाकाबंदी करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. हे आंदोलन केवळ पंजाबमधील शेतकऱ्यांचे आहे असे भासविण्याचा केंद्र सरकारने प्रथम केवळ पंजाबच्या शेतकऱ्यांना चर्चेला पाचारण केले. हा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.