फेस मास्क वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची नवी मार्गदर्शकतत्वे


मुंबई : फेस मास्कच्या वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने असा सल्ला दिला आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या भागांत वाढत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याआधी जूनमध्ये फेस मास्कसाठी गाईडलाइन्स जारी करत सांगितले होते की, फॅब्रिक मास्कचा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला वापर करणे बंधनकारक करा. विशेषकरून ज्या भागांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फेस मास्कचा वापर बंधनकारक करा.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव ज्या भागांत वाढत आहे, तेथील 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा. दुकाने, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे फेस मास्कचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाइन्सनुसार, अशी ठिकाणे जिथे एअर एक्झॉस्टची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. तसेच एअर एक्झॉस्टची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गर्दी असेल तर फेस मास्क वापरावा. त्याचबरोबर व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी फेस मास्क सुरक्षित आहे. तसेच त्याचसोबत इतर सुरक्षात्मक उपाय जसे हात स्वच्छ ठेवण्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे.

गाइडलाइन्समध्ये सांगितल्यानुसार हेल्थ केअर वर्कर्स, जे कोरोना रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी एन-95 मास्कचा वापर करावा. जागतिक आरोग्य संघटनेने असा सल्ला देखील दिला आहे की, शारीरिक परिश्रमाची कामे करताना लोकांनी मास्क वापरू नये. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासाशी निगडीत आजार होण्याचा धोका संभवतो.