जडेजाच्या फलंदाजीने मांजरेकर प्रभावित; गोलंदाजी सुधारण्याचाही सल्ला


मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज, समालोचक आणि विश्लेषक संजय मांजरेकर यांनी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील फलंदाजीचे कौतुक केले आहे. जडेजाच्या फलंदाजीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे नमूद करतानाच त्याने गोलंदाजी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही मांजरेकर यांनी दिला आहे.

मांजरेकर हे खेळाडूंच्या कामगिरीबाबत परखड भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा अडचणीत येण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. मात्र, रवींद्र जडेजाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील फलंदाजीने आपण प्रभावित झाल्याचे मांजरेकर यांनी नमूद केले आहे. या सामन्यात जडेजाने सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊन हार्दीक पांड्याच्या साथीने १०८ चेंडूत १५० धावा काढत भारतीय धावसंख्येला आकार दिला. त्याने ५० चेंडूंवर ६६ धावा पटकावल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याचा महत्वपूर्ण बळीही जडेजाने मिळविला.

या सामन्यात शेवटच्या ३-४ षटकांमध्ये जडेजाने कौशल्यपूर्ण फलंदाजीचे दर्शन घडविले. चेंडूला समजून घेऊन त्याने क्षेत्र रक्षणातील शोधलेल्या वाटा (गॅप्स) कौतुकास्पद आहेत. त्याची फलंदाजी चतुरस्त्र होती, अशा शब्दात मांजरेकर यांनी जडेजाच्या खेळीचे कौतुक केले. जडेजाच्या खेळीने हार्दिकच्या मनावरील ताणही हलका केला. हार्दिक आणि जडेजाच्या खेळीमुळेच भारत या स्पर्धेत टिकू शकला, असेही मांजरेकर यांनी नमूद केले.

जडेजाच्या फलंदाजीमध्ये सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. अधिकाधिक बाली घेऊन त्याने ‘मॅच विनर’ गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही मांजरेकर यांनी व्यक्त केली.