चिनी ड्रॅगनशी लढण्यास भारतीय नौदल सज्ज: नौसेनाप्रमुखांची ग्वाही


नवी दिल्ली: पूर्व लद्दाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीकडे नौदलाची नजर असून नौदलाची टेहळणी करणारी टी ८१ विमाने आणि ड्रोनही त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत समुद्रातही चीनशी लढण्यासाठी नौदल सज्ज आहे, अशी ग्वाही नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.

नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला ऍडमिरल करमबीर सिंग यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

हिंदी महासागरात अतिक्रमण झाल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदल सक्षम आहे. हवाईदल आणि लष्कराशी नौसेनेच्या सातत्याने संपर्क आहे. तिन्ही दलांमध्ये चांगला समन्वय आहे, असे त्यांनी सांगितले.

आव्हानाच्या परिस्थितीमध्ये ठामपणे उभे टाकण्यासाठी नौदलाची पूर्ण तयारी आहे. समुद्रामध्ये आपली क्षमता वाढविण्यासाठी नौदल तयारी करीत आहे. आपल्याला असणाऱ्या आवश्यकतांबद्दल नौदलाला स्पष्ट कल्पना आहे. तिसरी विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे, असे नौदलाप्रमुखांनी सांगितले. ‘मेरीटाईम थिएटर कमांड’च्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते दृश्य स्वरूपात दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.