डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला “मी पुन्हा येईन” राग


वॉशिंग्टन – जो बायडन यांच्याकडून अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर व्हाइट हाऊसमधील आपल्या सामानाची आवराआवर करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचे मंगळवारी आयोजन केले होते. ट्रम्प यांनी या वेळी बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन ते २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ट्रम्प यांनी या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन, असे म्हटल्यामुळे ट्रम्प यांनी आता थेट २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.

मागील चार वर्षे खूपच छान असल्याचे आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना ट्रम्प यांनी म्हटले. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य या पार्टीमध्ये उपस्थित होते. याच सदस्यांना उद्देशून ट्रम्प यांनी, आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच तुमच्या भेटीसाठी मी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असेच आत्ता सांगू शकतो, असे म्हटले आहे.

यासंदर्भात एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार २० जानेवारी २०२४ रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला ट्रम्प हे सुरुवात करणार आहेत. ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत यासंदर्भात चर्चाही केली आहे. ट्रम्प यांनी मागील आठवड्यामध्ये आपले वकील २०२० चे निकाल बदलू शकले नाहीत, तर आपण २०२४ ची निवडणूक लढू असे म्हटले होते. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.