जानेवारीपर्यंत कोरोना लसीला मिळू शकते आपत्कालीन मंजुरी; एम्सच्या संचालकांची माहिती


नवी दिल्ली – दिल्ली -एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज कोरोना लसीला डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीस आपत्कालीन वापराची मंजूरी मिळू शकते, अशी माहिती दिली.

डॉ. गुलेरिया म्हणाले, की आता अंतिम टप्प्यात भारतातील काही लस आल्या आहेत. आम्हाला आशा आहे की त्यापैकी एखाद्याला लसीला डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरूवातीस रेगुलेटरकडून आपत्कालीन वापराची मंजुरी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल. सध्या सहा लसींवर भारतात काम सुरू आहे. यात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर आले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी गेल्या आठवड्यात भारतात बनत असलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी लवकरच अर्ज करण्याची तयारी करत आहेत.

डॉ. गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे असे म्हणता येईल की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. या लसीच्या सेफ्टी आणि अ‍ॅफिकेसीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही लस 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. कोणतेही गंभीर दुष्परिणाम आतापर्यंत समोर आलेले नाहीत. डेटा सूचित करतो की अल्प-मुदतीची लस सुरक्षित आहे.

क्लिनिकल चाचण्या पूर्ण होण्यापूर्वी चीनने त्याच्या 4 आणि रशियाने 2 लसांना मान्यता दिली होती. त्यानंतर यूकेने अमेरिकन कंपनी फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोएनटेक यांनी 2 डिसेंबरला तयार केलेल्या mRNA लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.