यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला ब्रिटन पंतप्रधान प्रमुख पाहुणे

फोटो साभार सीएनएन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन २६ जानेवारी २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील असे समजते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी फोनवरून बोरीस यांच्याशी बोलताना भारतभेटीचे औपचारिक निमंत्रण दिल्याचे आणि ब्रिटीश पंतप्रधान भारत भेटीवर येण्यास उत्सुक असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. ब्रिटीश हायकमिशन प्रवक्त्याने या संदर्भात आत्ताच काही स्पष्ट करणे शक्य नसल्याचा खुलासा केला आहे मात्र त्याचवेळी बोरीस जॉन्सन लवकरात लवकर भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे मान्य केले आहे.

करोना लस संदर्भात युकेने मोठी घोषणा केली असून फायझर आणि बायोएनटेक करोना लसीला मान्यता दिली आहे. अशी मान्यता देणारा ब्रिटन पाहिला देश ठरला आहे. पुढच्या आठवड्यापासून युके मध्ये सर्वसामान्य जनतेला करोना लस उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी १९९३ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. त्यानंतर आता बोरीस जॉन्सन येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे यंदा करोना महामारी मुळे प्रजासत्ताक दिनाची परेड होणार वा नाही हाच मुळात प्रश्न आहे. पण प्रमुख पाहुणे कोण याची चर्चा मात्र सुरू आहे.