मॅराडोनाच्या ६५० कोटींच्या संपत्तीवरून वादावादी

फोटो साभार अल फुटबॉलेरो

चापल्य, खेळातील कौशल्य यामुळे जगप्रसिध्दी मिळविलेला फुटबॉलपटू दिअॅगो मॅराडोना याच्या निधनाला एक आठवडा उलटत असतानाचा त्याच्या संपत्तीवरून वादावादी सुरु झाली आहे. मॅराडोनाच्या वकिलाकडून मिळालेल्या महितीनुसार मॅराडोनाने मृत्युपत्र केलेले नव्हते आणि त्याच्याकडे ६५० कोटींची संपत्ती आहे. संपत्तीचा हा वाद दीर्घकाळ चालेल असेही या वकिलांनी सांगितले.

मॅराडोनाने एकच विवाह केला होता आणि त्याला दोन मुली आहेत. नंतर त्याने तीन मुले दत्तक घेतली होती. पण मॅराडोनाला एकूण ११ मुले आहेत असा दावा केला जात असून ज्या मुलांना त्याने दत्तक घेतलेले नाही तीही त्याच्या संपत्तीत वाटा मागत आहेत.

गतवर्षी मुलीशी भांडण झाल्यावर मॅराडोनाने सर्व संपत्ती दान करून टाकीन अशी धमकी दिली होती. पण अर्जेंटिना मधील कायद्यानुसार कुणीही संपत्तीचा पाचवा हिस्साच दान करू शकतो. एकूण संपत्ती पैकी दोन तृतीयांश संपत्ती पत्नी आणि मुलांना मिळते. विशेष म्हणजे मॅराडोना आणि विवाद यांचे नाते फार जवळचे राहिले आहे. पूर्वी खेळत असताना त्याच्या विषयी अनेक वाद होते आता संपत्तीवरून वाद सुरु आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मृत्यूबद्दल सुद्धा वाद निर्माण झाला आहे. मॅराडोनाच्या मुलीने मॅराडोनाचा मृत्यू डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या क्लिनिक आणि घरावर पोलिसांनी छापे घातले आहेत.