योगींनी मुंबईत केली उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटी घोषणा


मुंबई – उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज याची अधिकृत घोषणा मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगींनी ही घोषणा सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर केली. त्याचबरोबर योगींनी यावेळी ठाकरे सरकार आणि शिवसेनेकडून झालेल्या टीकेलाही उत्तर दिले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. यासंदर्भात या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. ही सिनेसृष्टी नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ उभी राहिल. ही फिल्मसिटी आशियातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर उभी करणार आहोत. उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधने या ठिकाणाहून असतील. यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीविषयी योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आला. योगी आदित्यनाथ त्याला उत्तर देताना म्हणाले, कुठेही काहीही आम्ही घेऊन जाणार नाही. मुंबईतील फिल्मसिटी आहेत तिथे काम करणार असून उत्तर प्रदेशात नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार नवीन फिल्मसिटी उभी करणार असल्याचे म्हणत योगी यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.