आज लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार दाखल संजय राऊत


मुंबई : आज लीलावती हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त असून शुक्रवारी दुपारी संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर ह्रदयविकाराशी संबंधित उपचार सुरू आहेत. त्यांना आज लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर उद्या शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापनेची एक वर्षापूर्वी हालचाल सुरू होती. तेव्हा एकहाती मैदान गाजवत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आणले होते. संजय राऊत यांची प्रकृती या धावपळीत खालावल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संजय राऊत यांच्यावर त्यावेळी लीलावती रूग्णालयातच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. पण त्रास वाढू लागल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. राऊत यांच्यावर लीलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू हे अँजिओप्लास्टी करणार आहे. संजय राऊत आज सायंकाळी लीलावती रूग्णालयात दाखल होणार असून सुरुवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल.