रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणी मिळाला जामीन


मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास करताना बॉलीवूडमधील ड्रग अँगलचा खुलासा झाला होता तेव्हापासून अद्यापपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरुच आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला बुधवारी एनडीपीएस न्यायालयाने जामीन दिला. विशेष कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी त्याची जामीन याचिका फेटाळून लावली होती.

५ सप्टेंबर रोजी एनसीबीने शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली होती. यापूर्वी सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर रियाला जामीन मिळाला होता. त्याचबरोबर न्यायालयाने रियाला प्रत्येक १० दिवसानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासही सांगितले होते.

ईडी आणि एनसीबी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारे तपास करत आहेत. तर दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (आयआयएमएस) डॉक्टरांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळली होती. तपासाअंती सुशांतने फाशी घेतल्याचे या डॉक्टरांनी म्हटले होते.