विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या – गुजरात उच्च न्यायालय


अहमदाबाद – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोना संकट अद्याप कमी झालेले नसल्यामुळे केंद्रासोबतच राज्य सरकार देखील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना सातत्याने करत आहे. पण लोकांकडून वारंवार कोरोना नियमांना केराची टोपली दाखवण्यात येत असून, विनामास्क फिरताना लोक दिसत आहेत. गुजरात उच्च न्यायालयाने या विषयावर चिंता व्यक्त करताना अशा लोकांवर कारवाई करण्याचे सरकारला निर्देश दिले आहेत.

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती जे.बी. पर्दीवाला यांच्या खंठपीठाने विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. कोरोनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन जे नागरिक करत नाहीत, त्यांना सर्वांना कोविड सेंटरमध्ये सेवा करणे अनिवार्य करण्याचे आदेश काढण्यात यावे, असे राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सांगितले.

कोरोना नियमांचा जे लोक भंग करत आहेत, त्यांना कोणत्याही कोविड सेंटरमध्ये कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. त्यांच्याकडून दिवसांतून चार ते पाच तास काम करून घेण्यात यावे, असे न्यायालयानं आदेशात म्हटले आहे. कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, जेवण तयार करणे, मदत करणे, सेवा करणे, कोविड केंद्रातील इतर कामे, त्याचबरोबर माहिती तयार संकलित करण्याची कामे नियमभंग केलेल्या नागरिकांकडून करून घेतली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्या व्यक्तीच्या वय, पात्रता, लिंग यानुसार ही शिक्षा ठरवली जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारने यासंदर्भातील कार्य अहवाल सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.