एनसीबीची न्यायालयाकडे भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करण्याची मागणी


मुंबई : ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली होती. ते दोघेही सध्या जामिनावर असून भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा ड्रग्ज प्रकरणातील जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे.

86.5 ग्रॅम गांजा भारती आणि हर्षच्या घरातून जप्त केल्यानंतर त्या दोघांनाही 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर या दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यात आता एनसीबीने भारती आणि हर्षचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. याबरोबरच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी देखील केली आहे. या संदर्भात भारती आणि हर्षला न्यायालयाने मंगळवारी नोटीस पाठवली असून, त्यावर या आठवड्यातच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.