मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी


मुंबई : आज मुंबईच्या दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून ते यावेळी बॉलिवूड कलाकार आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत मुंबईचे वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचे आहे. मनसेने आता त्यांच्या याच कृतीला होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

मुंबईत योगी आदित्यनाथ ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, त्याच हॉटेलच्या खाली मनसेकडून अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…’ अशा आशयाचे होर्डिंग लावले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी युपीचा “ठग” म्हटले आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्न असल्याचेही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटले आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही हेच होर्डिंग लावण्यात आले आहे.

‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…’. ‘कुठे महाराष्ट्राचं वैभव…तर कुठे युपीचं दारिद्र…’ ‘भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.’ ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, असे मनसेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये म्हटले आहे.

मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यांच्या सरकारने यासाठी नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री योगी यांनी याच पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली. अभिनेता अक्षयकुमार देखील मुख्यमंत्री योगी यांना भेटला.

नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी मुख्यमंत्री योगी स्वत: आग्रही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारलेली फिल्मसिटी मुंबईहून कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, म्हणून योगी आदित्यनाथ मुंबईतील बड्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ स्वत: चित्रपटसृष्टी निर्मितीवर मंथन करत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.