शेतकरी आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत – व्ही. के. सिंह


नवी दिल्ली – दिल्लीच्या दिशेने आंदोलनासाठी निघालेले हजारो शेतकरी अद्यापही सिंधू सीमेवर ठाण मांडून बसले असून आंदोलक शेतकऱ्यांना सरकारने बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण सरकारच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत कृषी विधेयक सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नसल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर विरोधी पक्षाचा हात शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे असल्याचा आरोप व्ही. के. सिंह यांनी केला आहे. आता शेतकरी आंदोलनावरुन व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मी जे फोटो पाहत आहे, त्यातील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. सरकारने जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे तेच केले आहे. कृषी विधेयकाची शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोक आहेत. विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही या आंदोलनामागे हात असल्याचे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.