हिंमत असेल तर फिल्मसिटी महाराष्ट्राबाहेर नेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे योगी आदित्यनाथ यांना आव्हान


मुंबई – सध्या मुंबई दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून बुधवारी त्यांनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये लखनऊ महानगरपालिकेचा बाँड लॉन्च केल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची योगी भेट घेणार आहेत. दरम्यान योगींच्या या दौऱ्यावरून वादही सुरू झाले असून स्पर्धा असणे चांगले आहे. पण आम्ही कोणाची धमकी सहन करणार नसल्याचा इशार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी संध्याकाळी इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांमध्ये आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही. उलट इतर राज्यांतील उद्योगपती देखील महाराष्ट्रात येतील. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, स्पर्धा असणे चांगले आहे. पण आरडाओरडा करून, कोणी जर धमकी देत एखादा उद्योग बाहेर नेणार असतील तर मी तसे होऊ देणार नाही. काही लोक आजही तुम्हाला भेटतील आणि आमच्याकडे या म्हणतील. दरम्यान हिंमत असेल तर येथील उद्योग बाहेर नेऊन दाखवा अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी योगी यांचे नाव न घेता दिला.