त्या शेतकरी वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास कंगना विरोधात ठोकणार मानहानीचा दावा


नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावतला शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून कंगनाला ही कायदेशीर नोटीस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी पाठवली आहे. त्यामुळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.

७ दिवसांचा अल्टीमेटम कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाने या सात दिवसात माफी न मागितल्यास मानहानीची तक्रार तिच्याविरोधात दाखल केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीचा आंदोलन करणे हा संविधानिक विशेष अधिकार आहे. पण या वृद्ध महिलेसह देशातील अन्य महिलांचादेखील कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे अपमान झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी कंगनाने माफी मागावी. तसेच तिने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं हाकम सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर माफी मागण्यासाठी कंगनाला ७ दिवसांची मुदत दिल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.