शेतकरी आंदोलन; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद


नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दारावर केंद्र सरकारच्या तीन कृषि विधेयकांविरोधात ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. पण सरकारची शेतकरी संघटनांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांचे जत्थे दिल्ली-नोएडा सीमेवर दाखल झाल्याने दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.

३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मंगळवारी विज्ञान भवनात केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. शेतकरी वादग्रस्त कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असून, त्यांचे आंदोलनही कायम आहे.

बुधवारी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाचे पडसाद उमटले. दिल्लीच्या सीमांवर उत्तर प्रदेशातून आंदोलक शेतकरी दाखल झाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. गौतम बुद्ध दरवाजाजवळच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने पोलिसांना दिल्ली-नोएडा लिंक रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळवावी लागली असून पोलिसांकडून नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.