तज्ज्ञांची डीसीजीआयकडे कोव्हिशिल्डच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करण्याची मागणी


नवी दिल्ली – पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूटने एस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आणि रोगप्रतिबंध सक्षम असल्याचा दावा केला असला तरी काही तज्ज्ञांनी लसीच्या चाचण्यादरम्यान झालेल्या दुष्परिणामांबाबतची माहिती लपविल्याचा आक्षेप केला आहे. तसेच ही प्रक्रिया पारदर्शी करत संपूर्ण माहिती केंद्रीय औषध महानियंत्रक विभागाने (डीसीजीआय) जाहीर करावी, अशी मागणीही तज्ज्ञांनी केली आहे.

चेन्नईतील चाळीस वर्षीय स्वयंसेवकाच्या मेंदूच्या कार्यात कोरोना प्रतिबंध कोव्हिशिल्ड लस टोचल्यानंतर बिघाड झाल्याची तक्रार दाखल झाली होती. औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती याप्रकरणाची चौकशी करत असल्याचे अधिकृतरित्या भारतीय वैद्यकीय परिषदेने रविवारी जाहीर केले. पण यानंतर नैतिकता समितीला दोनच दिवसात संबंधित या घटनेविषयी कळविले होते.

समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर मंजुरी दिल्यानंतरच पुन्हा चाचण्या सुरू केल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी जाहीर केली आहे. याचा अर्थ या घटनेनंतर चाचण्या थांबविल्या होत्या. परंतु आत्तापर्यंतच्या माहितीनुसार कधीही तात्पुरत्या काळासाठी लसीच्या चाचण्या थांबविलेल्या नाहीत. सुरक्षितता हा चाचण्याचा प्रमुख उद्देश आहे. सीरमकडून दिल्या जाणाऱ्या निवेदनातून दिशाभूल केली जात असून विरोधाभास निर्माण होत आहे. तेव्हा या घटनेबाबत चाचण्यांना परवानगी देणाऱ्या डीसीजीआयने पारदर्शीपणे माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी ऑल इंडिया ड्रग अक्शन नेटवर्कने (एआयडीएएन) केली आहे.

त्याचबरोबर सीरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असतानाच केलेल्या खुलाशामध्ये पहिल्याच वाक्यात ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिबंध असल्याचा दावा केला असून अजूनही चाचण्यांची सुरक्षितता तपासणीच्या प्रक्रियेत असल्याचेही एआयडीएएने स्पष्ट केले आहे.

संबंधित व्यक्तीने चाचण्यांदरम्यान झालेल्या दुष्परिणामांची माहिती जाहीर केल्यानंतर हा दावा सीरमने देखील फेटाळून लावला. परंतु डीसीजीआयने या प्रकरणी अधिकृतरित्या कोणतेही उत्तर दिलेले नाही. ऑक्सफर्डच्या परदेशात झालेल्या चाचण्यांमध्ये आढळलेले दुष्परिणाम जाहीर केल्यानंतर चाचण्या थांबवून आवश्यक प्रक्रिया केल्यावर पुन्हा सुरू देखील करण्याचे घोषित केले. मग ही पारदर्शकता भारतातील चाचण्यांबाबत का बाळगली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही लसनिर्मिती कोरोना साथीच्या काळात महत्त्वाचा टप्पा असून यासंबंधी अनेक बाबी जोडलेल्या आहेत. पण कंपनी या प्रकरणी केवळ माहिती देत असून त्याला डीसीजीआय प्रत्युत्तर देत नसल्याने साशंकता निर्माण होत आहे. भविष्यात जनतेमध्ये लसीच्या सुरक्षिततेबाबत या वादामुळे अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा लोकांमध्ये लसीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी चाचण्यांची प्रक्रिया पारदर्शी असणे आवश्यक असल्याचे संशोधक आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. अनंत भान यांनी व्यक्त केले.