आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्या भेटीवरून संजय राऊत यांची टीका


मुंबई – मंगळवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी मुंबईत आल्यानंतर सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी तयार करणार असल्याचे म्हटले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्या भेटीवरून माध्यमांशी संवाद साधताना टीका केली आहे.

योगी आदित्यनाथ मुंबईत आले हे मला माहित नाही. ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसले आहेत त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसल्याचे मी पाहिले. त्यांच्यासाठी अक्षय कुमार कदाचित आंब्याची टोपली घेऊन गेला असेल. मुंबईतील फिल्मसिटी कोणी हलवण्याची गोष्ट करत, असेल तर तो विनोद आहे. ते म्हणतात, एवढे सोप्पे काम नाही, त्याला एक इतिहास असल्याचे राऊत म्हणाले. त्याचबरोबर मी योगी आदित्यनाथांना एवढंच विचारू इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करू इच्छित तर करा. परंतु जी फिल्मसिटी नोएडामध्ये तयार केली जात आहे, त्याची आज काय परिस्थिती आहे. किती चित्रपटांचे चित्रीकरण त्याठिकाणी होत आहे? हे पण जरा त्यांनी मुंबईत येऊन सांगावे, असे राऊत यांनी म्हटले.