गाड्यांच्या कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे बँकेने नितेश राणेंना पाठवली जप्तीची नोटीस!


सिंधुदुर्ग- दिवसागणिक राणे कुटुंबीय व शिवसेना यांच्यामधील वाद वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत असतानाच मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या इनोवा कार आणि इतर बारा बोलेरो गाड्यांसाठी नितेश राणे यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. पण सदर वाहनांची रक्कम अजूनपर्यंत बँकेकडे जमा झालेली नसल्यामुळे जिल्हा बँकेकडून नितेश राणे आणि संबंधित जामीनदारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

संबंधित वाहन मालक आणि जामीनदार यांना कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे वारंवार नोटीसा पाठवूनही थकबाकीची रक्कम अदा न करण्यात आल्यामुळे जिल्हा बँकेने काही काळ उलटल्यानंतर संबंधित वाहन मालक आणि जामीनदारांना १०१ ची नोटीस पाठवून गाड्या जप्तीचे आदेश दिले असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारे मोठे विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.