सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत ‘तारक मेहता..’ अव्वलस्थानी


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपट व मालिकांची यादी आघाडीचे सर्च इंजिन ‘याहू’ने जाहीर केली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने या यादीत बाजी मारली आहे. ‘तारक मेहता..’ या लोकप्रिय मालिकेने ‘मिर्झापूर’, ‘बिग बॉस’ यांसारख्या वेब सीरिज व रिअॅलिटी शोला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

पौराणिक मालिका ‘महाभारत’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तर ‘रामायण’ चौथ्या स्थानावर आहे. या मालिका कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये पुन्हा प्रक्षेपित करण्यात आल्या होत्या. यात तिसऱ्या क्रमांकावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूजचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट आहे. सुशांतच्या अकस्मात मृत्यूनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो पाचव्या स्थानावर आहे. तर टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ हा चित्रपट सहाव्या स्थानावर आहे. या यादीत टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त शो बिग बॉस सातव्या स्थानावर आहे. तर आठव्या स्थानावर वरुण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट आहे. अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेला विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट नवव्या स्थानावर तर ‘मिर्झापूर’ दहाव्या स्थानावर आहे.