काय आहे इस्त्रायलचे नवे हत्यार स्मॅश हॉपर गन?

फोटो साभार नवभारत टाईम्स

इराणच्या अणु प्रकल्पाचे तज्ञ अणुशास्त्रज्ञ मोहसीन फार्वारी जाहेद यांची नुकतीच झालेली हत्या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेने म्हणजे मोसादने केली असल्याचा दावा इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी आणि धर्मगुरू आया खमनेई यांनी केला आहेच पण ही हत्या इस्त्रायलच्या अत्याधुनिक बंदुकीच्या सहाय्याने केली असल्याचेही त्यांचे म्हणजे आहे.

इराणच्या दाव्यामुळे चर्चेत आलेली ही बंदूक नक्की काय आहे याची अनेकांना उत्सुकता आहे. ही बंदूक ऑटोमॅटिक आहेच पण ती रिमोट कंट्रोलने नियंत्रित करता येते. ही बंदूक स्वतःच टार्गेट लोकेट करून लॉक करते आणि दुरवर बसलेला माणूस टॅब्लेट सारख्या बिनतारी डिव्हाईसचा वापर करून ती हवी तेव्हा फायर करू शकतो. यात बंदूक चालविण्यास प्रत्यक्ष शुटरची आवश्यकता नसते. विशेष म्हणजे या बंदुकीतून बुलेट प्रूफ वाहने सुद्धा टार्गेट करता येतात.

इस्त्रायलच्या स्मार्ट शुटर या कंपनीने जुलाई मध्ये मॅन पोर्टेबल ऑटोमेटीक बंदूक लाँच केली होती. स्मॅश हॉपर गन किंवा लाईट रिमोट कंट्रोल वेपन स्टेशन असे तिचे नाव आहे. संगणकीकृत गनसाईट, माउंट मिळून बनलेल्या ट्रायपोड वर ती जमीन किंवा वाहनाच्या टपावर बसविता येते. ही बंदूक स्वतः लक्ष्य शोधते आणि दुरवर बसलेल्या माणसाकडून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फायर करता येते.

इराणमध्ये ज्या पद्धतीने जाहेद यांची हत्या झाली त्यावेळी ते ज्या मार्गाने शहरात येणार होते तेथे अगोदरच एक ट्रक गोलाकार भागात उभा केला गेला होता. जेव्हा जाहेद यांची बुलेटप्रूफ गाडी ट्रकच्या टप्प्यात आली तेव्हा अचानक जोरदार फायरिंग झाले आणि नंतर स्फोट होऊन ट्रक संपूर्ण जळून गेला. त्यामुळे सर्व पुरावे नष्ट झाले. शिवाय त्या जागी अगोदर कुणीही माणूस नजरेस पडला नव्हता. यामुळे ही हत्या इस्त्रायलच्या या नव्या शस्त्रानें केली असा दावा केला जात आहे.