योगींच्या झंझावाताने ठाकरे हैराण

फोटो साभार आउटलुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ हिम्मत असेल तर बॉलीवूड मुंबईबाहेर नेऊन दाखवा ‘ असे नाव न घेता दिलेले आव्हान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले असून फिल्म सिटी बाबत आदित्यनाथ ज्या वेगाने काम करत आहेत त्यामुळे ठाकरे यांच्यावर हैराण होण्याची पाळी आली आहे. योगी आदित्यनाथ मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंट येथे आहे. येथे आल्यावर योगींनी बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार, गायक कैलाश खेर यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. यावेळी त्यांनी फिल्मसिटी मध्ये कोणत्या सुविधा सवलती दिल्या जातील याची माहिती दिल्याचे समजते.

योगींच्या या झंझावाताने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. योगी फिल्म सिटीची नुसती घोषणा देऊन थांबलेले नाहीत तर नॉयडा फिल्मसिटीचे काम वेगाने सुरु केले आहे. योगी आज मुंबई शेअर बाजारात लखनऊ महापालिकेच्या बॉंड विक्रीचा शुभारंभ करत आहेत त्याचवेळी ते मुंबईतील उद्योजकांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करावी यासाठी उद्योजकांच्या भेटी घेणार आहेत.

दरम्यान नॉईडा फिल्मसिटी विकासाच्या तपशीलवार योजनेसाठी विविध संस्थांकडून निविदा मागविल्या गेल्या आहेत. या निविदा ३ डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार असून ७ डिसेंबरला ओपन केल्या जाणार आहेत आणि १५ डिसेंबरपर्यंत ज्यांना काम द्यायचे ती कंपनी निश्चित केली जाणार आहे. यमुना अॅथॉरीटी एरिया सेक्टर २१ मध्ये १ हजार एकर जागेवर फिल्म सिटी तयार केली जात असून त्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.