येथे आहे जगातील एकमेव कौसल्या माता मंदिर

रामजन्मभूमी अयोध्या येथे दिवाळी आणि वाराणसी येथे देवदिवाळी निमित्त नुकताच दीपोत्सव साजरा झाला. असाच दीपोत्सव दरवर्षी छतीसगढ़ येथील चंदखुरी येथेही साजरा केला जातो. राम वनगमन मार्गावर येणारे हे छोटेसे गाव ऐतिहासिक महत्वाचे आहे. हे गाव रामाची माता कौसल्यादेवी हिचे जन्मस्थळ असून येथे जगातील एकमेव कौसल्यामाता मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून त्याचा जीर्णोद्धार केला जात आहे.

चंद्खुरी हा १२६ तलाव असलेल्या गावातील जलसेन तलावात कौसल्या मातेचे देशातील हे एकमेव मंदिर आहे. हे गाव रामाचे आजोळ आहे आणि वनवासातील बराच काळ रामाने येथे वास्तव्य केले होते असेही मानले जाते. इतकेच नव्हे तर रामाच्या बालपणाचा बराच काळ येथे गेला अशीही मान्यता आहे.

येथे दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि प्रथेप्रमाणे सर्वप्रथम कौसल्या मंदिरात पणती लावून मगच नागरिक स्वतःच्या घरात पणत्या लावतात. छतीसगढ़ सरकारने राम वनगमन मार्गावरील ५१ स्थळे विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात कौसल्या माता मंदिराचा समावेश आहे. हे गाव तीर्थस्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. त्रेता युगात हा दंडकारण्याचा भाग होता आणि रामाने उत्तरप्रदेशातून बाहेर पडल्यावर या अरण्यात वनवास काळ व्यतीत केला होता असे मानले जाते.