राणेंच्या ‘त्या’ दाव्याची सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली


पुणे : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या एका गौप्यस्फोटावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नेमके कोणत्या पाटलांबद्दल राणे बोलले मला याची कल्पना नसल्याचे म्हणत सुळे यांनी राणेंच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आज सत्तेत नसते तर भाजपमध्ये जयंत पाटील हे असते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जयंत पाटील यांची त्यासंदर्भात बोलणी देखील झाली होती, असा दावा नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत अलीकडेच केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या संदर्भात पत्रकारांनी पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी बारामतीतील मतदान केंद्रावर आलेल्या सुप्रिया सुळे यांना विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, नेमके कोणत्या जयंत पाटलांविषयी राणे बोलले हे मला माहीत नाही. अनेक जयंत पाटील महाराष्ट्रातील राजकारणात आहेत. चार-पाच जयंत पाटलांना मी स्वत: ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असे वाटत नाही.

तत्पूर्वी राणेंचा हा दावा जयंत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. शरद पवारांचा मी कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या मनाला असा विचार कधी शिवतही नाही. माझी भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली नव्हती आणि राणे यांची गणती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होत नाही, हे जाणून खेद वाटला. नेमकी कुठल्या नेत्याशी, कुठे माझी चर्चा झाली होती याचा तपशील कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असे ते म्हणाले होते.