अजान स्पर्धेच्या आयोजनावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले


मुंबई: भारतीय जनता पक्षाने वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. ठाकरे सरकारने सहा महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवली होती. भाजपने त्यावरूनही शिवसेनेला लक्ष्य केले. याचदरम्यान भाजपने आता शिवसेनेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना दिली. सोशल मीडियावर याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असे मनाला वाटत राहते, अशा शब्दांत सकपाळ यांनी अजानचे कौतुक केले आहे.

आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन करणार असून आवाज, उच्चार हे निकष या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी असतील. किती मिनिटांत ते अजान संपवतात, कशा प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. परीक्षक म्हणून ते काम पाहतील. शिवसेनेकडून अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना बक्षीसे दिली जातील. शिवसेना या संपूर्ण स्पर्धेचा खर्च करेल, असे सकपाळ यांनी सांगितले. सकपाळ यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील निशाणा साधला आहे.


यासंदर्भात ट्विट करत नितेश राणे म्हणाले की, हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे. नाहीतर “हो मी नामर्द आहे? असे तरी” असे म्हणत उद्धव ठाकरे यांना नितेश राणे यांनी डिवचले आहे.