मॉडर्ना कंपनीचा लसीच्या आपातकालीन वापरासाठी एफडीएला अर्ज


वॉशिंग्टन – आपात्कालीन वापरासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार कोरोना संसर्गावर ही लस 94.1% परिणामकारक असल्याचे दिसून आले. तर ही लस काही प्रौढ रुग्णांमध्ये 100% प्रभावी असल्याचे निर्दशनास आले आहे. ही लस मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था ही एकत्रिपणे विकसित करत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील विविध कंपन्यांमध्ये लसींची निर्मिती सुरु आहे. त्यापैकी सकारात्मक परिणाम दाखवणारी मॉडर्ना बायोटेक फर्मची लस अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आहे. मॉडर्नाकडून या लसीच्या मंजूरी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी आम्ही युनाडेट स्टेस्ट फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे परवानगी मागत असल्याचे मॉडर्ना कंपनीने सांगितले. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालांनुसार ही लस कोरोना विरुद्ध 94.1 टक्के यशस्वी असल्याचे दिसून आले आहे.

काही रुग्णांमध्ये ही लस 100% प्रभावी असल्याचा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे. सर्व वयोगटातील आणि पुरुष, महिलांमध्ये या लसीचा प्रभाव समान आहे. अंग दुखी, डोकेदुखी यांसारखे लहान सहान दुष्परिणाम वगळता या लसीचे दुसरे कोणतेही मोठे चिंतेचे कारण नाही. आम्हाला असा विश्वास आहे की कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये ही लस खूप महत्त्वाचे शस्त्र ठरेल आणि लसीमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील, अशी माहिती मॉडर्ना कंपनीचे सीईओ Stéphane Bancel यांनी दिली.

या लसीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सहभाग घेतलेल्या हजारो स्वयंसेवकांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ही लस यशस्वी करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्सच्या केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे देखील मी आभार मानतो. तसेच आम्हाला ही लस बनवण्यासाठी मदत केलेल्या NIH, NIAID, BARDA या कंपन्यांचे देखील आम्ही आभार मानतो.

सातत्याने या लसीच्या येणारे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन एफडीएसमोर मॉडर्ना कंपनीने लसीच्या आपात्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. या लसीला मंजूरी मिळताच ही लस लवकरच बाजारात येऊ शकेल. युरोप, कॅनडा, युके, इज्राईल आणि सिंगापूर या देशांमध्ये सुद्धा मॉडर्ना लसीच्या चाचण्या सुरु असून तेथे देखील लसीचे यशस्वी परिणाम समोर येत आहेत. मॉडर्ना कंपनीची जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन यादीत स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.