अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून शेतकऱ्यांना न्याय द्या: राहुल गांधी


नवी दिल्ली: शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अहंकाराची खुर्ची सोडून खाली उतरावे आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क प्रदान करावे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमा झाले आहेत. त्यांना आज दुपारी चर्चेसाठी पाचारण करण्यात आले असले तरीही आपल्या मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, या भूमिकेवर आंदोलक शेतकरी ठाम आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कायद्यांच्या समर्थनावर ठाम आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सरकार आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत आणि ‘खोटे’ दूरदर्शनवर भाषणे देत आहेत. अन्नदाता शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कर्ज आपल्या डोक्यावर आहे. त्यांना न्याय दिल्यानेच या कर्जातून उतराई होता येणार आहे. त्यांना दूर लोटून, लाठ्या-काठ्या आणि अश्रुधुराचा मारा करून हे कर्ज फिटणार नाही. त्यासाठी जागे व्हा. अहंकाराच्या खुर्चीवरून खाली उतरून शेतकऱ्याला त्याचे हक्क प्रदान करा, अशा अर्थाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

यापूर्वी आपल्या ‘स्पीक अप इंडिया’ या व्हिडीओ मालिकेमध्येही राहुल गांधी यांनी या आंदोलनाचा उल्लेख केला आहे. न्याय मिळविण्यासाठी हजारो शेतकरी थंडीची पर्वा न करता आपले घर, शेतीवाडी सोडून दिल्लीला आले आहेत. सत्य आणि असत्याच्या लढाईत आपण कोणाच्या बाजूने आहात? अन्नदाता शेतकऱ्यांच्या की पंतप्रधानांच्या भांडवलशहा मित्रांच्या; असा सवाल त्यांनी केला आहे.