केंद्रीय मंत्र्यांचे आंदोलक शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवे कृषि विधेयक रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका घेतली असून शेतकऱ्यांचे सलग सहाव्या दिवशी आंदोलन सुरु आहे. या कृषि विधेयकाला प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या आंदोलनामध्ये पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.

पण हरयाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपुजन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी याच आंदोलनासंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कटारिया यांनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे, असे कटारिया यांनी म्हटले आहे. कटारिया हे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ठिकाणी पोहचले असता त्यांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर कटारिया संतापले. त्यानंतर आपले अंबालामध्ये सात ते आठ कार्यक्रम असल्यामुळे शेतकऱ्यांना विरोधच करायचा असेल तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असे वक्तव्य त्यांनी, केल्याचे वृत्त न्यूज १८ हिंदीने दिले आहे.

त्यांनी पुढे बोलताना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देव सद्बुद्धि देवो अशी मी हात जोडून प्रार्थना करतो, असेही म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी नवे कृषि विधेयक मागे घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे सांगितले. मागील पाच वर्षांपासून या भागामध्ये कटारिया हे आले नव्हते. कटारिया येथे आज आल्यानंतर शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध केल्याने ते चांगलेच संतापले.