केंद्र सरकारचे हेतू गंगेप्रमाणे शुद्ध: मोदींची शेतकऱ्यांना ग्वाही


नवी दिल्ली: कृषी कायदे करण्यामागील केंद्र सरकारचा हेतू गंगेप्रमाणे शुद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकलेल्या शेतकरी आंदोलकांना दिली आहे. मात्र, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून ‘काळे’ कायदे रद्द करण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला धडक दिली आहे आज (दि. १) दुपारी ३ वाजता कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी पाचारण केले आहे.

नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच करण्यात आले आहेत. या कायद्यांमुळे लहान शेतकरी आपल्या रखडलेल्या व्यवहारांबद्दल दाद मागू शकणार आहेत. त्यामुळे त्यांची फसवणूक टाळता येऊ शकणार आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे आहेत, हे कालांतराने सिद्ध होईल,असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.

वाराणसी येथे एका सार्वजनिक सभेत बोलताना मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत विरोधकांवर ठपका ठेवला. सध्याच्या काळात खोट्या माहितीच्या आधारे विविध घटकांची दिशाभूल करून त्यांना भडकावणे आणि आंदोलने घडवून आणणे, अशी एक घातक पद्धत देशात रूढ होऊ पाहत आहे, मात्र, शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनीच अनेक दशकांपासून त्यांची पिळवणूक केली आहे, असा आरोप मोदी यांनी केला.