सोशल मीडियावर होत आहे अनुष्का शर्माच्या बेबी बंपसोबतच्या शीर्षासन फोटोची चर्चा


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात ती बाळाला जन्म देणार आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत गरोदरपणातील विविध फोटो आवर्जून शेअर करते. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून ती यामध्ये चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. अनुष्काने बेबी बंपसोबत केलेला हा शीर्षासन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अनुष्का भिंतीचा आधार घेऊन शीर्षासन करत असून तिच्या पायांना पती विराट कोहली आधार देत असताना फोटोमध्ये दिसत आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये, हा सर्वांत अवघड व्यायामाचा प्रकार असून माझ्या आयुष्याचा योगसाधना अविभाज्य घटक आहे. मी गरोदर असण्यापूर्वी जी काही योगासने करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते, असे माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. मी गेल्या अनेक वर्षांपासून शीर्षासन करत आहे. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या खातर माझ्या पतीने मला आधार दिला. माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सुद्धा करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. मी योगासने माझ्या गरोदरपणातही करू शकते याचा मला खूप आनंद असल्याचे म्हटले आहे.