कृषी कायदे मागे न घेतल्यास नाते तोडण्याचा ‘लोकतांत्रिक’चा इशारा


नवी दिल्ली: नवे कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक खासदार हनुमान बेनीवाल यांनी दिला आहे. गृहमंत्री अमित शहा यांना बेनीवाल यांनी पाठविलेल्या पत्रात त्यांनी रालोआशी असलेले नाते तोडण्याची धमकी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या भवन आणि नव्या कृषी कायद्यांबद्दल त्यांच्या मनात असलेला संताप लक्षात घेऊन त्वरित हे तिन्ही नवीन कायदे मागे घ्यावे, आंदोलक शेतकऱ्यांना सन्मानाने चर्चेसाठी पाचारण करावे आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, असे बेनीवाल यांनी शहा यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. लोकतांत्रिक पक्ष हा रालोआचा घटक पक्ष असला तरी किसान आणि जवान ही या पक्षाची खरी ताकद आहे. नवे कृषी कायदे रद्द न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकतांत्रिक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने युती करून लोकसभा निवडणूक लढविली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लोकतांत्रिक पक्षासाठी २५ जागा सोडल्या होत्या. त्यापैकी ३ जागांवर या पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.