या देशात मुस्लीम आहेत पण मशीद नाही

जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या क्रिश्चन धर्मियांची असून त्या खालोखाल मुस्लीम धर्मीय आहेत. जगातील बहुतेक सर्व देशात मुस्लीम आहेत तसेच ते युरोपीय देश स्लोवाकिया मध्येही आहेत. मात्र या देशात मुस्लीम असले तरी एकही मशीद नाही. इतकेच नव्हे तर येथे मशीद बांधायला कायद्यानेच मनाई केली गेली आहे.

स्लोवाकिया मध्ये तुर्की आणि उगर समाजाचे मुस्लीम आहेत. ते या देशात १७ व्या शतकापासून वास्तव्य करून आहेत. २०१० मध्ये त्यांची संख्या ५ हजार होती. हा देश युरोपीय युनियनचा सदस्य आहे. या देशात मशीद उभारू द्यावी यासाठी गेले कित्येक दिवस वाद सुरु आहेत. २००० साली राजधानीत इस्लामिक वक्फ सेंटर उभारणीवरून वाद झाला पण महापौरांनी हा प्रस्ताव अमान्य केला.

२०१५ मध्ये युरोप मध्ये मोठ्या प्रमाणावर शरणार्थी आले तेव्हा या देशाने २०० ख्रिश्चन लोकांना आश्रय दिला पण मुस्लिमांना मात्र प्रवेश करण्यास मनाई केली. त्यासाठी देशात मुस्लीम धर्मपालन करण्यास योग्य सुविधा नाही असे कारण दिले गेले होते. पण ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये या देशाने इस्लामला अधिकृत धर्म म्हणून मान्यता देण्यास प्रतिबंध करणारा कायदा पास केला आहे. त्यानुसार येथे मशीद बांधायला परवानगी नाही.