खरेदीची बात सोडाच, किंमत ऐकून येईल तोंडाला फेस

फोटो साभार अमर उजाला

महिला वर्गाचा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पर्स. प्रत्येक महिलेकडे अनेक प्रकारच्या पर्स असतात आणि तरीही पर्स या प्रकारची खरेदी त्या करतच असतात. मग कोणती पर्स किती महाग हा स्टेट्स सिम्बॉल बनतो. सेलेब्रीटीच्या पर्सच्या किंमती हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो. कुणाची पर्स १० लाखंची तर कुणाची आणखी महाग असली माहिती आवर्जून वाचली जाते. त्यात आता आणखी एका महागड्या पर्सची भर पडली असून ही जगातील सर्वात महाग पर्स ठरली आहे.

भारताचा विचार करायचा तर आशियातील नंबर एकचे श्रीमंत उद्योजक अंबानी परिवार सुद्धा ही पर्स खरेदी करण्यापूर्वी बराच विचार करेल असे म्हणायला जागा आहे. नीता अंबानी २ कोटी रुपये किमतीची पर्स वापरतात हे यापूर्वीच उघड झाले आहे. पण या नव्या महागड्या पर्सची किंमत ऐकून खरेदीची बात सोडाच पण तोंडाला फेस येण्याचीच जास्त शक्यता आहे. या पर्सची किंमत आहे, साठ लाख युरो म्हणजे  ५२ कोटी २१ लाख ६७ रुपये. लग्झरी इटालियन ब्रांड बोरिनी मिलानेसीची ही पर्स बनवायला १ हजार तास लागले आहेत.

कंपनी या प्रकारच्या फक्त तीन पर्स बनविणार असून या पर्स साठी मगरीचे कातडे वापरले गेले आहे. शिवाय त्यावर प्लॅटीनमची १० फुलपाखरे, चार हिरे, तीन पाचू सजविले गेले आहेत. पण एका विशिष्ठ कारणाने ही पर्स बनविली गेली आहे. समुद्र वाचवा अभियान अंतर्गत ही पर्स तयार केली गेली असून त्याच्या विक्रीतून मिळणारया रकमेतील ८ लाख युरो समुद्र स्वच्छ करण्याच्या अभियानात दिले जाणार आहेत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात असलेल्या प्लास्टिक मुळे जीवजंतू नष्ट होत आहेत त्यामुळे समुद्र वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.