करोना लसीची वाहतूक हे शतकातील मोठे आव्हान

फोटो साभार स्काय न्यूज

कोविड १९ प्रतिबंधात्मक लस तयार होईल, अनेक कंपन्यांच्या लसीला मान्यताही मिळेल पण ही लस जगातील ७ अब्ज नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे शतकातील सर्वात मोठे आव्हान असेल असे मत अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत. ७ अब्ज जनतेसाठी १४ अब्ज डोस लागतील आणि ते जागोजागी वेळेत, सर्व काळजी घेऊन सुरक्षित पोहोचविणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे. या लसीची वाहतूक करण्यासाठी ११० टन मालवाहतूक करण्याची क्षमता असलेल्या बोईंग ७४७ विमानांना ८००० फेऱ्या कराव्या लागतील आणि सर्व लोकांना लस मिळेपर्यंत दोन वर्षे जातील असे गणिक वाहतूक क्षेत्रातील जाणकार मांडत आहेत.

या लसीच्या वाहतुकीसाठी केवळ विमानेच नाही तर कार, बोटी, बसेस, ट्रक, मोटरसायकलच नव्हे तर सायकली सुद्धा वापराव्या लागतील तर काही ठिकाणी पायी जाऊन ही लस पुरवावी लागेल असे समजते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे आयएटीए कडून मिळालेल्या माहितीनुसार विमानांच्या किमान ८ हजार फेऱ्या कराव्या लागतीलच पण तापमान नियंत्रण व अन्य गरजा लक्षात घेऊन आखणी करावी लागेल.

आयएटीएच्या म्हणण्यानुसार या लसीची वाहतूक हा जगातील सर्वात मोठा लॉजिस्टिक एग्झरसाइज ठरणार आहे. संस्थेचे चीफ आलेग्झान्द्रो डी जुनियक म्हणाले सध्या माल वाहतूक करणारी दोन हजार विमाने आहेत. त्यातून जगात एकूण माल वाहतुकीच्या अर्ध्या मालाची वाहतूक होते. बाकी वाहतूक नेहमीच्या प्रवासी विमानांतून होते. लस दीर्घकाळ सुरक्षित आणि परिणामकारक ठेवण्यासाठी उणे ७० डिग्री तापमान आवश्यक असल्याचे सांगितले जात असून सध्या कोणत्याच विमान कंपनीकडे ही सुविधा नाही. त्याचबरोबर स्टोरेज व्यवस्था करावी लागणार आहे. विकसनशील आणि गरीब देशात या सुविधा नाहीत. त्यामुळे सध्या ७० टक्के जनतेला लस मिळावी असे प्रयत्न केले जाणार आहेत.