सर्वात मोठा नरसंहार; बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या


नायजेरिया – नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार सुरू केला असून तब्बल 110 शेतकऱ्यांची कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने दिली आहे. गळा चिरून या लोकांची बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने सार्वजनिकपणे हत्या केली आहे आणि त्यांच्या स्त्रियांनाही आपल्यासोबत घेऊन गेले आहे. याबाबत माहिती देताना संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी समन्वयक एडवर्ड कल्‍लोन म्हणाले की, कमीतकमी 110 लोकांना बोको हरामने निर्घृणपणे ठार मारले. याव्यतिरिक्त, बरेच लोक जखमी झाले आहेत.

त्याचबरोबर मृतांची संख्या सुरुवातीला 43 होती, जी नंतर वाढून 70 झाली. शेवटी 110 लोकांची हत्या झाल्याचे समोर आले. सामान्य नागरिकांवर अत्यंत हिंसक मार्गाने झालेला थेट हल्ला आहे. न्यायालयात या हत्यारांना उभे केले पाहिजे, असे देखील कल्लोन यांनी म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोशोबेची ही घटना असून ही जागा मैदगुरी शहराजवळ आहे. भाताच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना मारेकर्‍यांनी ठार केले. अल जजीराच्या वृत्तानुसार, या अत्यंत क्रूर हल्ल्यात आधी कामगारांना बांधून ठेवण्यात आले आणि नंतर त्यांचे गळे कापले.

या हल्ल्याचा नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मदू बुहारी यांनी निषेध केला आहे. संपूर्ण देश या हत्येमुळे जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वायव्य नायजेरियातील सोकोतो राज्यामधील कामगारांचा मृतांमध्ये समावेश होता, जे सुमारे 1000 किलोमीटर (600 मैल) दूर होते आणि ते कामाच्या शोधात येथे आले होते. आठ जण या हल्ल्यात बेपत्ता आहेत, जहादींनी त्यांना पळवून नेले आहे. सध्या घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. जबरमारी गावात सर्व मृतदेह नेण्यात आले आहेत, जिथे त्यांना रविवारी दफन करण्यापूर्वी ठेवले गेले होते. जिहादी वादात 2009 पासून सुमारे 36 हजार लोक मरण पावले आहेत आणि 20 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.