धक्कादायक! बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या


चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ तसेच डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल करजगी आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली.

अद्याप मृत्यूचे नेमके कारण पुढे आलेले नाही. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. शर्विल नावाचा सहा वर्षांचा त्यांना मुलगा आहे. डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.