उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया


कर्जत – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाचे आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले असून राज्यातील ज्येष्ठ नेतेच यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आता तेच नेते सत्तेत असून तुम्ही मराठा समाजाचा अजून किती दिवस अंत पाहणार आहात, असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे नेमके काय बोलले हे मला माहिती नसल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नसून एकत्र राहून आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढावा लागेल. श्रेय कोणाला घ्यायचे नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत, त्यांना याचे श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.