मोदींची आज कोरोना लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत महत्त्वाची चर्चा


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत चर्चा करणार आहेत. लस विकसित करणाऱ्या जीननोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आज ३० नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात गुंतलेल्या तीन टीम्ससोबत चर्चा करतील, अशी माहिती पीएमओने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. शनिवारीच अहमदाबादच्या झायडस पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टि्टयूटला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन लस निर्मितीच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर आज मोदी तीन टीम्स सोबत चर्चा करणार आहेत.

सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांनी शनिवारी तासभर चर्चा केली. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. सध्या सीरम इन्स्टीट्यूटकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड-एस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत आहे.

Loading RSS Feed