कपिल शर्माचे शेतकरी आंदोलनावरुन ट्रोल करणाऱ्याला सणसणीत उत्तर


पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झाले असून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. देशाच्या विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिले आहे. या आंदोलनाबाबत प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यानेही एक ट्विट करत आपले मत मांडले, त्यावर कपिलला एका नेटकऱ्याने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण कपिलनेही त्याला सणसणीत प्रत्युत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.

राजकीय रंग शेतकऱ्यांच्या मुद्द्याला न देता हा मुद्दा चर्चेने निकाली काढायला हवा. चर्चेने सुटू शकत नाही असा कोणताही मुद्दा नसतो. शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही सर्व देशवासी आहोत. तो आमचा अन्नदाता असल्याचे ट्विट करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कपिल शर्माने एकप्रकारे आपला पाठिंबा दिला.


जिगर मेवात नावाच्या एका युजरने कपिल शर्माच्या या ट्विटवरुन त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कपिलच्या ट्विटला त्याने रिप्लाय देत, चुपचाप कॉमेडी कर…तुझे जे काम आहे, त्यावर लक्ष दे असे म्हटले. युजरच्या या ट्विटवर कपिलही शांत बसला नाही आणि त्यानेही त्याला सणसणीत उत्तर दिले. मी माझे कामच करत आहे. तुम्हीही तुमचे काम करा. देशभक्त लिहिल्याने कोणी देशभक्त होत नाही. आपले काम करा आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावा. ५० रुपयांचे रिचार्ज करुन फालतूचे ज्ञान पाजळू नको… धन्यवाद, असे कपिलने त्याला उत्तर दिले. दरम्यान, पंजाब-हरयाणाचे शेतकरी गेल्या ४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसले असून जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.