विना PUC गाडी चालवल्यास रद्द होईल गाडीचा परवाना !


नवी दिल्ली : विना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला आता हे महागात पडू शकते. कारण विना PUC गाडी चालवताना आता पकडल्यास तुमच्या गाडीचा परवाना (RC) रद्द होऊ शकतो. मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये सरकारने काही नव्या तरतुदी केल्या आहेत. यानुसार प्रदुषण रोखण्यासाठी पीयुसीचे काटेकोर पालन होणे आवश्यक मानले जात आहे.

अधिसूचना जारी करत रस्ता परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे, वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वाहन चालकाकडे नसल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून वाहनाचे आरसी बूक जप्त करण्यात येईल. रस्ता परिवहन मंत्रालयाने याबाबत पीयूसीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याआधी यावर सूचना मागवल्या आहेत. तसेच 2 महिन्यांचा कालावधी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागेल, असेही म्हटले आहे.

वाहन चालकाकडे तपासणी दरम्यान वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर हे कागदपत्र संबंधिताला सादर करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी मिळेल. गाडी मालकाने या वेळेतही पीयूसी सादर केली नाही, तर गाडीचे आरसी बूक जप्त करण्यात येईल. त्याचबरोबर 7 दिवसात पीयूसी नुतणीकरण देखील करावे लागेल. विशेष म्हणजे पीयूसीसाठी लवकरच एक क्यूआर कोड सिस्टम लागू करण्यात येणार आहे. गाडीच्या मालकाचे नाव, नोंदणी क्रमांक आदी सर्व गाडीचे कागदपत्र आणि माहिती यात असेल.