पँगाँग सरोवराच्या परिसरात ‘मार्कोस कमांडोज’ची तैनाती


नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोज म्हणजे मार्कोसची तैनाती पूर्व लडाख सीमेवर पँगाँग सरोवराच्या परिसरात करण्यात आली असून भारतीय नौदलाची मार्कोस ही एलिट कमांडो फोर्स आहे. भारतीय आणि चिनी सैन्य पूर्व लडाख भागात आमने-सामने असून अद्यापही सीमावादावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

मार्कोस अंडरवॉटर म्हणजे पाण्याखालून कुठलेही ऑपरेशन करण्यामध्ये महारत असणे. इंडियन एअर फोर्सची गरुड कमांडो फोर्स, भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस संघर्षाला सुरुवात झाली, पहिल्या दिवसापासून त्या या भागामध्ये तैनात आहेत. मार्कोसच्या येण्यामुळे आता तिन्ही दलाच्या स्पेशल फोर्सेसचे एकत्रिकरण झाले आहे. त्याचबरोबर अतिथंड प्रतिकुल वातावरणात ऑपरेशन्सचा मार्कोस कमांडोजना एक वेगळा अनुभव मिळेल.

आधीपासून भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर पँगाँग लेक सरोवरात आहे. पण या मरीन कमांडोजना आता सहज, सुलभतेने वेगवान हालचाल करता यावी, यासाठी खास नवीन बोटी सुद्धा मिळणार आहेत. लष्कराची पॅरा स्पेशल फोर्स आणि एसएफएफ या कमांडो टीमही या भागात विशेष ऑपरेशन करण्यासाठी आधीपासून कार्यरत आहे. नियंत्रण रेषेजवळील उंच टेकडयांवर एअर फोर्सचे गरुड कमांडोज इग्ला सिस्टिमसह तैनात आहेत. भारताच्या हवाई हद्दीत शत्रूचे कुठलेही विमान घुसल्यास त्यावर इग्ला सिस्टिमधुन लगेच रॉकेट हल्ला करता येतो.